माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे माजी सैनिकास आंध्र विद्यापीठाद्वारे कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) पदवी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. या संधीचा इच्छूक माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. अशा माजी सैनिकांना कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी हा करार झालेला आहे.
हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य शासन तसेच इaतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी मोठे योगदान देणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे हा उद्देश आहे.
पात्रता व अटी:
माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
- अर्जदार माजी सैनिक असावा.
- अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअर फोर्स द्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र असावे.
- माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी.
- दि. 1 जानेवारी 2010 नंतर निवृत्त झालेला असावा.
- माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षांचा अभ्यासक्रम (2 वर्ष 12 वि + 3 वर्ष पदवी) लागू राहील.
- या अभ्यासक्रमाचे शुल्क 12 हजार 500 रुपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत.
अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट देऊन circulars / publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.