१५ ऑगस्टपूर्वी ७५ हजार पदांची मेगाभरती! १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत पदभरतीचे नियोजन

राज्य शासनाच्या ४३ विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची मेगाभरती केली जाणार आहे.

भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरूणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगाभरतीचा कृती आराखडाच शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी मेगाभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून प्रक्रया सुरु होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) शिंदे- फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट- ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिक्त पदे वाढली आहेत.

एकाच अधिकऱ्याकडे अनेक आस्थापनांचा पदभार सोपविल्याने 'निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान'ला अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, कोरोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सध्या कोणतीही अडचण राहिलेली नाही. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती, राज्यात वाढलेली बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मेगाभरती करावीच लागणार आहे. त्यादृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ऑगस्टपूर्वीच ३० ते ३२ हजार शिक्षकांची भरती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ६७ हजार पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून पटसंख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर २०२२-२३ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३पूर्वी भरली जातील. पुढच्या वर्षी उर्वरित ५० टक्के पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद स्तरावरच नोकर भरती

जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवरच होत होती. पण, राज्य सरकारने तो निर्णय बदलून राज्यस्तरीय भरतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदांचा पूर्वीचा कर्मचारी भरतीचा अधिकार संपुष्टात आला होता. परंतु, आता पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषद पातळीवरच कर्मचारी भरती होईल. सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण १८ हजार ९३९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेअखेरीस ग्रामविकास विभागाकडून त्यासंबंधीचे आदेश निघतील.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे होईल मेगाभरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मेगाभरतीची घोषणा केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्याचे नियोजन सुरु आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून भरतीची प्रक्रिया लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न राहील.

- सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री


Post a Comment

Previous Post Next Post